Wednesday, October 9, 2019

महात्मा गांधी जयंती निमित्त व्याख्यान


‘महात्मा गांधी ते ग्रेटा थनबर्ग यांचे  पर्यावरणवादी विचार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

            महात्मा गांधीजींच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आजरा महाविद्यालय आजरा मधील समाजशास्त्र व पर्यावरणशास्त्र विभागाच्यावतीने ‘महात्मा गांधी ते ग्रेटा थनबर्ग यांचे पर्यावरणवादी विचार’ या विषयावर प्रा. सुनिल गुरव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना प्रा. सुनील गुरव यांनी पर्यावरणाच्या जागतिक प्रश्नांचे मूळ कारण मानवाने तयार केलेली मनुष्यकेंद्रीय व्यवस्था कारणीभूत असल्याचे सांगितले. औद्योगीकरण, वाहनांचा अतिवापर, लोकसंख्यावाढ, चंगळवाद, प्राणी शेती यामुळे पर्यावरणाच्या व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे मानवासह पृथ्वीतळावरील सर्व सजीवसृष्टीच धोक्यात आली आहे. या बिघडलेल्या पर्यावरणाच्या समतोलासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पर्यावरणीय विचारांची अंमलबजावणी केली पाहिजे. स्वीडन या देशातील सोळा वर्षाची ग्रेटा थनबर्ग ही मुलगी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, शाश्वत विकासासाठी चंगळवाद सोडा, मांसाहार बंद करा, इंधणाचा वापर कमी करा, विमान प्रवास टाळा, पारंपरिक ऊर्जेचा वापर करा असे आवाहन करत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत जागतिक नेत्यांच्या समोर बोलताना  तिने आपले बालपण हिराहून घेतल्याचा आरोप केला. पर्यावरणाविषयी संवेदनशील व्हा आणि मानवनिर्मित व्यवस्था बदलण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा अशी हाक देत आहे. तिला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. सामाजिक असहकार आंदोलनाद्वारे हे शक्य आहे. विद्यार्थ्यांनी ग्रेटा थनबर्ग  प्रमाणे बंड करून उठले पाहिजे असे मत आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.   



            उपप्राचार्य राजीव टोपले अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, ग्रेटा थनबर्ग  ही विद्यार्थ्यांच्या समवयस्क आहे पण तिचे विचार गांधीजींच्या मार्गाने जाणारे आहेत. ग्रेटा प्रसिद्धीसाठी हे आंदोलन करत नाही तर पर्यावरणाच्या किंबहुना मानवाच्या भविष्यासाठी चळवळ उभी करीत आहे. विद्यार्थ्यांनी ग्रेटा थनबर्ग प्रमाणे स्थानिक पातळीवरील समस्या शोधून व त्यांचे निराकरणासाठी प्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन केले.
            या कार्यक्रमाची सुरुवात ‘वैष्णव जन हो’ या भजनाने झाली. त्यानंतर गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. अविनाश वर्धन यांनी प्रास्ताविक केले. कु. दत्ता खंडू दारूटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार कु. पूजा धनाजी गुरव  हिने मानले तर सूत्रसंचालन कु. खदीजा तकीलदार हिने केले. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. डॉ. रणजीत पवार व प्रा. चंद्रकांत खोराटे यांनी केले. याप्रसंगी प्रा. राम मधाळे, प्रा. भाग्यश्री चव्हाण व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे                                                प्रा. अविनाश वर्धन
पर्यावरणशास्त्र विभाग                                                    समाजशास्त्र विभाग